१८ परदेशी नागरिक सापडले : पोलिसांकडून गुन्हा दाखल कुणाकुणाच्या संपर्कात आले याची माहिती नसल्याने सर्वत्र एकच खळबळ

0
432

प्रतिनिधी,दि.१४ (पीसीबी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या २१ दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. दि. २५ मार्च पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा , रेल्वे व दळणवळणाच्या सर्व सेवा बंद करण्यात आले आहेत. देशात लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी अमरावती शहरात अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आफ्रिकेतील टोगोलीस रिपब्लिक व म्यानमार या देशांमधून १८ पुरूष व महिला पर्यटक साबणपुरासह इतर मशिदीत रहात असलेले परदेशी नागरिक धार्मिक कामासाठी शहरात आल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांना आता क्वॉरंटाइन केले आहे. लॉकडाऊन मध्ये २१ दिवस हे परदेशी नागरिक कुणाकुणाच्या संपर्कात आले याची अद्याप कोणतीही माहिती नसल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव हा संसर्गातून होत असल्यामुळे विदेशांतून येणार्‍या प्रत्येक नागरिकांची वैद्यकिय तपासणी शासनाच्या वतीने केली जात होती. असे असतानाही कोणतीही तपासणी न करता अमरावती शहरातील साबनपुरा परिसरात अमेरिकेतून आलेली एक व्यक्ती, दक्षिण आफ्रिका व पश्चिम आफ्रिकेतील टोगोलीस रिपब्लिक या देशातून आलेले दोन व्यक्ती व म्यानमारमधून आलेले पाच महिला व पाच पुरूष असे एकूण अठरा परदेशी नागरीक वास्तव्याला होते. या १८ व्यक्तींकडे पर्यटनाचा व्हिसा आहे. परंतु हे व्यक्ती धार्मिक कामासाठी शहरात आल्याची खबर पोलिसांना मिळाली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी म्यानमारमधून आलेल्या दहा जणांविरुद्ध तर उर्वरित आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन, फॉरेनर अ‍ॅक्ट व साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या नागरिकांचे मरकज कनेक्शन असण्यााची शक्यता असल्याने त्याचा तपास देखील पोलीस करत आहेत. या १८ परदेशी नागरिकांना क्वारंटाईन करून त्यांचे थ्रॉट स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर होण्याच्या पूर्वीपासून पर्यटनाच्या नावाखाली आलेले १८ विदेशी नागरिक धार्मिक कामासाठी अमरावतीच्या दाट लोकवस्तीच्या भागात वास्तव्यास असतात आणि त्याची साधी भनकही प्रशासनाला नसते, ही बाब चिंतेची आहे. संपूर्ण देश कोरोना विरोधात युद्ध लढत असताना १८ परदेशी नागरिकांना पाहुणे म्हणून आपल्या घरी, सार्वजनिक ठिकाणी ठेऊन घेणे अत्यंत चिंताजनक आहे. शासनाने आपल्या परिसरात, कोणी परप्रांतीय किंवा परदेशी लोक असल्यास स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन केल्यावर देखील २३ मार्च पासून ही माहिती पोलिसांपासून का दडवून ठेवण्यात आले ? वास्तव्या दरम्यान ते कुठे व कुणाकुणाच्या संपर्कात आले ? यासारख्या अनेक गंभीर प्रश्नांचा तपास प्रशासनाला करावे लागणार आहे.