११ जुन पर्यंत मान्सून मुंबईत येणार ?

0
312

नवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) – नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून पाऊस सरासरीइतका बरसणार असल्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला आहे. आता तो कधी येणार याचेही संकेत मिळाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तो १६ मेपर्यंत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागावर दाखल होऊ शकणार आहे. मान्यून मुंबईत ११ जुनपर्यंत दाखल होईल. दरम्यान, १३ ते १५ मे या कालावधीत प्रामुख्याने विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि मध्य महाराष्ट्रात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १४ मे रोजी कोकण विभागातही पावसाचा अंदाज आहे.

सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. दरवर्षी २० मे रोजी अंदमानात धडकणारा मान्सून यंदा १६ मेपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभाग आणि स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पाच दिवसानंतर श्रीलंकाकडे रवाना होतो आणि आठवडाभरानंतर केरळमध्ये धडकतो. गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या आगमान आणि समापनचा कालावधी बदलला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्माण झालं आहे. पूर्व भारतामध्ये तीन ते सात दिवस उशीरा मान्सून दाखल होणार आहे. तर उत्तर-पश्चिम भारतातही उशीराने आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सूनचे आगमन उशीरा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल. ११ जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये धडक देऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून ३ ते ७ दिवस लवकर किंवा उशिरानं येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातही १५ जुलैऐवजी ८ जुलैला मान्सून दाखल होईल. राजधानी दिल्‍लीमध्ये यंदा २३ जून ऐवजी २७ जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता स्कायमेटने दर्शवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यांदा २९ सप्टेंबर ऐवजी ८ ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा कालावधी राहणार आहे.