हॉटेल ठेका रेस्टो आणि लॉजवर झाली पोलिसांची एन्ट्री; आणि समोर आलं ‘हे’ प्रकरण

0
512

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) – बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हॉटेल ठेका रेस्टो आणि लॉन्ज या हुक्‍का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा घातला. हिंजवडी येथे शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलचा मालक, चालक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वैभव प्रल्हाद वारडे (वय 35, रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, निगडी), शुभम महादेव मुळे (रा. पिंपरी) यांच्यासह चार ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वारडे हा हॉटेलचा मालक तर मुळे हा हॉटेल चालक आहे. आरोपी हे विनापरवाना हुक्‍का पार्लर चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांनी हॉटेल ठेका रेस्टो आणि लॉन्ज या हुक्‍का पार्लरवर छापा घातला. त्यावेळी चार ग्राहकही हॉटेलमध्ये मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 50 हजार रुपये हुक्‍का पिण्याचे साहित्य आणि रोख एक हजार 160 रुपये जप्त करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, प्रणील चौगुले, कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, नामदेव राठोड, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, राजेश कोकाटे आणि योगेश तिकडे यांच्या पथकाने केली.