‘हे कुठले बाळासाहेब?’ बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम

0
365

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – निवडणूक आयोगाने शिंदे गटाने सुचविलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाला मान्यता दिली. आपल्या नावात बाळासाहेबांचा उल्लेख असल्यामुळे शिंदे गटातील आमदारांना आनंदही झाला होता. आयोगाच्या घोषणेनंतर ‘आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ असे द्वीट एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. ‘हे कुठले बाळासाहेब?’ बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम, असा खिल्ली उडवणारा सवालही एका युजरने एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यामुळे आगामी काळात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावरुन आणखी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जळजळीत टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीवार्दातून झाला. ज्या प्रबोधनकरांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्त्व मिटवण्याचे अधम आणि नीच कृत्य एकनाथ शिंदे या गारद्याने केले. शिंदे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. या मुखवट्यामागे भ्रष्ट, बेईमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटवल्या की, गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे!छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यावर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे’. त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, अशी घणाघाती टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.