हिंजवडी ते चाकण मार्गावर एसी बस धावणार; आमदार जगतापांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर

0
574

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – हिंजवडी ते चाकण मार्गावर बसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. या मार्गावर आता पाच वातानुकूलित बसेस (एसी) धावणार आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या वातानुकूलित बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून ३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. तसेच दापोडी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते चिंचवड, एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी आमदार जगताप यांनी सरकारकडून ७० लाखांचा निधी आणला आहे. त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध व्यायामशाळांमध्ये व्यायामाचे साहित्य खरेदीसाठी ५० लाख आणि औंध ऊरो रुग्णालयाच्या परिसरात पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे करण्यासाठीही आमदार जगताप यांनी ५० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्यासाठी एकूण ५ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.