हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी – बाळासाहेब थोरात

0
361

मुंबई,दि.१०(पीसीबी) – हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असं ट्वीट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज सकाळी ६.५५ वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेवर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत सुन्न करणारी आहे. तिच्या जाण्याने हिंगणघाटातील दारोडा गावावर शोककळा पसरली आहे. पीडितेवर आरोपीने पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना घडली होती.

दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेनं सकाळी अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं जात आहे.