हातभट्टीची दारू विक्री करणा-यास अटक; 10 लिटर दारू जप्त

0
396

भोसरी, दि.१७ (पीसीबी) : एमआयडीसी भोसरी परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणा-या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 10 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 15) सायंकाळी करण्यात आली.

मनोज जग्गुसिंग तामचीकर (वय 33, रा. भाटनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई पंकज हंबर्डीकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरात जे ब्लॉक येथे एक व्यक्ती हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी जे ब्लॉक येथे विप्स इंडिया कंपनीसमोरून मनोज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक हजार 200 रुपये किमतीची दहा लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. पोलिसांनी त्याला अटक करून सीआरपीसी 41(1)(अ) प्रमाणे नोटीस बजावली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.