हवेलीतील मैत्रीपूर्ण लढतीमध्ये म्हस्केंचा पराभव; विकास दांगटांची बाजी…

0
421

हवेली , दि. ४ (पीसीबी) – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७ जागांवरील आज मतमोजणी होत आहे. यात मुळशीनंतर हवेलीचा दुसरा निकाल हाती आला आहे. हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्केंना पराभवाची धूळ चारत विकास दांगट विजयी झाले आहेत. तब्बल २० वर्ष संचालक असलेल्या म्हस्के यांचा ११ मतांनी पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. जो निवडून येईल तो उमेदवार आपला हे सूत्र राष्ट्रवादीने याठिकाणी लागू केले होते.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर ७ जागांसाठी २ तारखेला मतदान पार पडले होते. यात हवेली तालुका मतदारसंघातून प्रकाश म्हस्के यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास दांगट हे एकमेकांविरोधात रिंगणात होते. म्हस्के हे देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच ज्येष्ठ नेते आहेत. मात्र त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे यावर उपाय म्हणून पक्षाने याठिकाणी मैत्रीपुर्ण लढत जाहिर केली होती.
दांगट हे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नेते आहेत. येथून ते दोनदा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. तसेच २००९ मध्ये मनसेचे रमेश वांजळे यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात ते अपयशी झाले. नंतर २०१७ त्या महापालिका निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता जिल्हा बॅंकेसाठी त्यांनी कंबर कसली आणि आज विजयही संपादन केला आहे.