हवाई हल्ल्याचे पुरावे मागून विरोधकाकडून सुरक्षा यंत्रणेचे खच्चीकरण – पंतप्रधान मोदी  

0
674

पाटणा, दि. ३ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे विरोधक मागत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सुरक्षा दलांचे खच्चीकरण करत आहेत, असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) येथे साधला.

बिहारमधील पाटणा येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदी बोलत होते. दहशतवादाविरोधात एकजूट दाखवण्याची गरज आहे. तर दुसरीकडे दिल्लीत २१ पक्ष एनडीएविरोधात ठराव मांडत होते. असेही मोदी म्हणाले.

सध्या आपली सुरक्षा दले देशात आणि सीमेपलीकडे कारवाई करून दहशतवाद नष्ट करत आहेत. त्याचवेळी देशातील काही लोक आपल्या सुरक्षा दलांचे खच्चीकरण करत आहेत, असे मोदी म्हणाले. हा नवीन भारत आहे. आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.  हा भारत गप्प बसणारा नाही, असा इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला .

विरोधक एकत्र येऊन मोदींना संपवू ,असे म्हणत आहेत, पण आपण सर्व एकत्र येऊन दहशतवाद संपवू  मी देशासाठी रस्ते तयार करत आहे, मात्र ते लोक मलाच रस्त्यातून हटवण्याचा कट आखत आहेत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर  केली. देशातील नागरिक त्यांना माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.