स्वत:च घर सांभाळा, इतरांच्या भानगडीत पडू नका; नसिरुद्दीन शहांनी इम्रान खानला सुनावले

0
1318

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी बुलंदशहर हिंसाचारासंदर्भात केलेल्या विधानावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला डिवचले. यावर  तुम्ही स्वत:च घर सांभाळा, इतरांच्या भानगडीत पडू नका, असे सांगत नसिरुद्दीन शाह यांनी इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले.  इम्रान खान यांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी इतरांच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वत:चा देश सांभाळण्याकडे लक्ष द्यावे. आमच्या देशात गेल्या ७० वर्षांपासून लोकशाही आहे.  त्यामुळे स्वत:चे प्रश्न कसे हाताळायचे, हे आम्हाला ठाऊक आहे, अशा शब्दांत शहा यांनी खान यांच्यावर हल्ला चढवला.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर हिंसाचाराविषयी बोलताना नसीरुद्दीन शहा यांनी या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे, असे म्हटले होते. यावर  इम्रान खान यांनी  म्हटले होते की, नसिरुद्दीन शहा यांनी आता जे म्हटलंय ते पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी फार पूर्वीच म्हटले होते. भारतात मुस्लिमांना बरोबरीची वागणूक मिळत नाही, हे जिना यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली, असे  खान यांनी म्हटले होते.

दरम्यान, नसिरुद्दीन शहा यांना अजमेर साहित्य संमेलनात जाण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. नसिरुद्दीन शहा आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार होते. यावेळी ते एका परिसंवादतही सहभागी होणार होते. मात्र, भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच याठिकाणी निदर्शने सुरु केली. या कार्यकर्त्यांनी नसिरुद्दीन शहा यांची पोस्टर्स जाळली होती.