सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

0
438

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आज ( बुधवारी) बीसीसीआयचे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे अध्यक्षपदी गांगुलीची निवड होणार असल्याचे  निश्चित मानले जात होते.   

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ  आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.  त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही आजच होणार आहे.  तसेच  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याची बीसीसीआय सचिवपदी  तर   बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांची  कोषाध्यक्षपदी    बिनविरोध झाली.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. पण या पदासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता.