सोशल मिडियात अजितदादांबद्दल आक्षेपार्ह भाषा, बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत धुमश्चक्री

0
92

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रंगत वाढत आहे. सोशल मिडिया या माध्यमाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रूप अॅडमिला जबाबदार धरून गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. अशातच सोशल मिडियावर अजितदादांबद्दल खालच्या स्तरावरची भाषा वापरत असल्याचा आरोप करत, त्यांना समजून सांगा, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे केली आहे. अजितदादांनी तालुक्यासाठी भरपूर केले आहे. त्यांच्याबद्दल बदनामीकारक शब्द वापरले जाऊ नये, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

करंजे (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत कोपरा सभा पार पडली. सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे युवा कार्यकर्ते मिलिंद दरेकर, रोहन गायकवाड, सूर्यकांत पिसाळ, निखिल शेंडकर यानी युगेंद्र पवार यांनी भेट घेतली. अजितदादांबद्दल सोशल मिडियात तुमच्या गटाचे काही कार्यकर्ते चुकीची भाषा वापरतात. नालायक… अशा शब्दांचा उल्लेख करून बदनामी करतात, अशी तक्रार केली. कार्यकर्त्यांना सूचना देण्याची मागणी केली.

दरम्यान, पवार यांनी मी माहिती घेतो असे उत्तर दिले. तर राजेंद्र जगताप यांनी, ‘दोन्ही गटांनी एकमेकांबद्दल असे बोलू नये. तसे कोणी बोलले असेल तर दुरूस्त करू’ असे स्पष्ट केल्यावर चर्चा निवळली. मात्र, सोशल मिडियावर युगेंद्र पवार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला, जाब विचारला अशा प्रकारच्या बातम्या पसरविण्यात आल्या. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा तालुकाध्यक्ष प्रशांत बोरकर, उपाध्यक्ष सुशिल जगताप म्हणाले की, घेराव घालायला पाच-पन्नासजण हवे आहेत. आधी ते चारजण आमच्याकडेच आले आणि युगेंद्र पवार यांना विनंती करायची आहे असे विचारले. सभा झाल्यावर त्यांनी सोशल मिडियात खालच्या पातळीवर बोलले जाते, अशी तक्रार केली. यानंतर व्हिडीओ करून संबंधित युवकांनी चुकीचा मेसेज व्हायरल केला. पूर्ण पवार कुटुंबिय आदरणीयच आहे. त्यांच्याबद्दल कुणीच चुकीचे बोलू नये, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, याबाबत बोलताना अजित पवार गटाचे मिलिंद दरेकर यांनी सांगितले की, युगेंद्र पवार यांच्याशी बाचाबाची झालेली नाही. आम्ही दहा-बारा जणांनी सोशल मिडियात अजितदादांची बदनामी होत असल्याची तक्रार केली. युगेंद्र पवार यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले. आमच्यासाठीपण पूर्ण कुटुंबिय आदरणीय आहे.