सोनोग्राफी व एक्सरे मशीनवरचे कर्जाची माहिती न देता मशीनची विक्री; फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
336

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) : तीन सोनोग्राफी आणि दोन एक्सरे मशीनवर कर्ज असताना त्याची माहिती न देता मशीनची विक्री करून मशीन खरेदी करणा-या दवाखान्याची फसवणूक केली. याबाबत दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2018 पासून 18 फेब्रुवारी 2021 या कालावधीत यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, पिंपरी येथे घडली.

डॉ. मनीष नंदलाल तरडेजा, रचना मनीष तरडेजा (दोघे रा. जुना नेरुळ, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संदीप भोगीलाल शहा (वय 48, रा. महर्षीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा यांची रुबी हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रा. ली नावाची कंपनी आहे. त्या कंपनीमार्फत ते वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. आरोपी हे वे टू डायग्नोस्टिक प्रा ली कंपनीचे डायरेक्टर आहेत. आरोपींनी माता बाल रुग्णालय बेलापूर येथील सोनोग्राफी मशीन, जनरल हॉस्पिटल नेरुळ येथील एक्सरे मशीन, जनरल हॉस्पिटल वाशी येथील दोन सोनोग्राफी मशीन, जनरल हॉस्पिटल ऐरोली येथील एक्सरे मशीन फिर्यादी यांच्या कंपनीला विकल्या. विकलेल्या मशीनवर बँकेचे कर्ज होते. त्याची माहिती आरोपींनी जाणीवपूर्वक लपवून ठेवली आणि फिर्यादी यांची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.