सेंट जॉर्ज, जीटी, नायर रूग्णालयाला देवेंद्र फडणवीस यांची भेट; डॉक्टर, अधिष्ठात्यांशी चर्चा; आरोग्यसेवक, पोलिसांचे कौतूक अन् आभार

0
282

मुंबई, ०६ मे (पीसीबी) : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील कोरोना रूग्ण दाखल असलेल्या सेंट जॉर्ज, जीटी आणि नागर रूग्णालयांना भेटी देऊन डॉक्टर्स, नर्सेस, तैनात पोलिस कर्मचारी यांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या खंबीर लढ्याचा गौरव केला आणि त्यांचे आभार मानले.

या तिन्ही रूग्णालयाला भेट देऊन देवेंद्र फडणवीस यांनी तेथील डॉक्टरांकडून कोरोनाची सद्यस्थिती, उपचार, डॉक्टर्स, नर्सेस इत्यादींना असलेल्या सुविधांची माहिती घेतली. सेंट जॉर्ज रूग्णालयात त्यांनी अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आणि कोविड व्यवस्थापन प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. जीटी हॉस्पीटलमध्ये डॉ. अनंत शिंगारे आणि डॉ. देशपांडे यांच्याशी त्यांनी चर्चा करून माहिती जाणून घेतली. संपूर्ण देशात आज डॉक्टर्स, नर्सेस आणि सारेच आरोग्य कर्मचारी जोखीम पत्करून अतिशय चांगले काम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिश: भेटून या डॉक्टरांना धन्यवाद दिले. समाजाची ही फार मोठी सेवा आहे. त्यांचे हे काम संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नायर रूग्णालयात डॉ. जोशी यांच्याशीही कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली. सध्याची रूग्णस्थिती, उपचारांची दिशा, रूग्णालयातील व्यवस्था इत्यादींबाबत ही चर्चा होती. रूग्णालयाची सुरक्षा आणि होणार्‍या गर्दीचे नियंत्रण यात समतोल साधत पोलिस बंधू करीत असलेल्या बहुमूल्य कामगिरीसाठी त्यांनी पोलिसांना सुद्धा धन्यवाद दिले.