सुट्टीवर घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या

0
535

श्रीनगर, दि. ७ (पीसीबी) – कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रमजान ईदनिमित्त सुट्टी घेऊन घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अज्ञात बंदूकधारी गुरुवारी सायंकाळी अनंतनाग जिल्ह्यातील सदुरा गावातील जवान मंजूर अहमद बेग यांच्या घरी आले होते. घरामध्येच या दहशतवाद्यांनी बेग यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे.

बेग यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. निशस्त्र बेग यांच्यावर भ्याड हल्ला केला. गोळीबारात बेग गंभीर जखमी झाले. त्यानंतर बेग यांना त्यांचे कुटुबीय आणि शेजाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बेग यांच्या हत्येनंतर हल्लेखोरांना शोधण्यासाठी अनंतनागमध्ये जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. याआधीदेखील काश्मीरमधील सोपोर येथील लाईट इन्फेंट्रीचे जवान मोहम्मद रफी यातू सुट्टीवर घरी आलेले असताना त्यांचीदेखील दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.