दादा जे.पी. वासवानी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा; ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांची मागणी 

0
649

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – सिंधी समाजाचे धार्मिक व अध्यात्मिक गुरू दादा जे.पी. वासवानी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा. त्यांचे नांव उद्यानाला, महापालिका वास्तुला द्यावे, अशी मागणी जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी म्हटले आहे की, दादा जे.पी. वासवानी यांची जयंती २ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार करतानाच प्राण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठीही त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांनी १३० पुस्तकांचे लेखन केले असून त्यात अध्यात्मावरील १५ पुस्तकांचा समावेश आहे. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केले होते.

करूणा आणि विनयाचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या दादा जे.पी. वासवानी यांच्या कार्याची पिंपरी –चिंचवड महापालिकेने योग्य दखल घ्यावी. असंख्य अनुयायांना ज्यांनी आपल्या शिकवणीतून जीवनाचा बोध सांगितला, असे अध्यात्मिक गुरू दादा  जे. पी. वासवानी यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारावा. महापालिकेच्या एखाद्या वास्तुला, उद्यानाला जे.पी. वासवानी यांचे नांव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.