सिंधूचा विजय, श्रीकांतला धक्का, दुहेरीत धडाका

0
372

बर्मिंगहॅम, दि.१८ (पीसीबी) : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने विजयी सलामी दिली. महिला आणि पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांनी मोहिमेस यशस्वी सुरवात केली. मात्र, पुरुष एकेरीत भारताला अपयशाचे धनी व्हावे लागले. किदांबी श्रीकांतसह पी. कश्यपला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

महिला एकेरीत सिंधूने मलेशियाच्या सोनिया शेह हिचा २१-११, २१-१७ असा पराभव करून आपल्या मोहिमेस यशस्वी सुरवात केली. दुसरी गेम जिंकण्यास तिला झगडावे लागले. आता दुसऱ्या फेरीत सिंधूची गाठ डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सन हिच्याशी पडणार आहे. तिने स्लोवाकियाच्या मार्टिना रेपिस्का हिचा पराभव केला.

दुहेरीत धडाका
महिला आणि पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांनी कमाल केली. अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने बेनयापा एमसार्ड-नुन्ताकर्न एमसार्ड जोडीचे आव्हान अवघ्या ३० मिनिटांत २१-१४, २१-१२ असे मोडून काढले. सत्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टीने पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना अनिरुद्ध मयेकर आणि निखर गर्ग या जोडीचा २१-७, २१-१० असा पराभव केला.

पुरुष एकेरी भारताच्या पदरी मोठे अपयश पडले. आठव्या मानांकित श्रीकांतला जागितक क्रमवारीत ५७व्या स्थानावर असलेल्या आयर्लंडच्या नहात न्गुयेन याच्याकडून ११-२१, २१-१५, १२-२१ अशी हार पत्करावी लागली. पी. कश्यपला केंटो मोमोटाकडून पराभव सहन करावा लागला. मोमोटाने लढत २१-१३, २२-२० अशी जिंकली. पुरुषांच्या दुहेरीतील आणखी एक जोडी एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांचेही आव्हान संपुष्टात आले. त्यांना ओंग यू सिन-तेओ ए यी जोडीकडून २१-१३, २१-१२ अशी हार मानावी लागली.

संयोजक अन भारतीयांची पळापळ
कोविड १९च्या संकटामुळे संयोजकांना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील सकाळच्या सर्व लढती रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे स्पर्धेला सुरवात दुपारच्या सत्रात सुरवात झाली. त्याचवेळी तीन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपैकी एक असे चौघे पॉझिटिव्ह आढळल्याचा अहवाल आल्यामुळे भारतीय संघाचे धाबे दणाणले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या दुसर्या चाचणीत आधी पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंसह अन्य खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आणि सर्वाना खेळण्याची मान्यता देण्यात आली. पण, या सगळ्या काळात त्यांची धावपळ झाली यात शंका नाही.