महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम

0
580

पतियाळा, दि. १८ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने फेडरेशन करंडक स्पर्धेत तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम करताना प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव यांना खऱ्या अर्थाने श्रंद्धाजली अर्पण केली. अविनाशने ८ मिनिट २०.२० सेकंदाची नवी वेळ दिली.

नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थेत सुरू असलेल्या या स्पर्धेत आज भालाफेक प्रकारात नीरज चोप्रा याने स्वतःचा स्पर्धा विक्रम मोडला, तर गोळाफेर प्रकारात तजिंदरपाल सिंग याने ऑलिंपिक पात्रतेसाठी जोरदार प्रयत्न केले.

नीरजने या स्पर्धेत ८७.८० मीटर भालाफेक करताना नवा स्पर्धा विक्रम केला. अर्थात, ८८.०७ मीटरचा राष्ट्रीय विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्यापूर्वी, २६ वर्षीय तजिंदरपाल सिंग याने पाचव्या प्रयत्नांत २०.५८ मीटर गोळा फेक करताना ऑलिंपिक पात्रतेसाठी प्रयत्नांची शिकस्त केली. तजिंदरने आज प्रत्येक फेक २० मीटरहून अधिक केली. चौथा प्रयत्न त्याचा फाऊल गेला. पण, यानंतरही ऑलिंपिक पात्रतेच्या २१.१० मीटरपासून तो दूर राहिला. पण, त्याला अजूनही ऑलिंपिक पात्रतेची संधी आहे. तजिंदर सध्या जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावर आहे. अन्य २४ जणांच्या साथीने त्याला ऑलिंपिकमध्ये सहभागी होता येईल. जागितक मानांकनानुसार पात्र ठरणाऱ्या आठ खेळाडूंमध्ये तजिंदर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महिलांच्या ३,००० स्टिपलचेस शर्यतीत उत्तर प्रदेशाच्या पारुल चौधरी हिने अखेरच्या २०० मीटरमध्ये वेग वाढवताना महाराष्ट्राच्या कोमल जगदाळे अगदी थोड्याशा फरकाने हरवले. पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत हिमाचल प्रदेशाच्या अंकेश चौधरी याने उपांत्य फेरीत १ मिनिट ५०.८१ सेकंद अशी वेगवान वेळ दिली. उपांत्य फेरीत ही तिसऱ्या क्रमांकाची विक्रमी वेळ ठरली. पण, अंतिम फेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मनजित सिंगचे आव्हान असेल.

निकाल (फायनल) : पुरुष

१०००० मी : १. अभिषेक पाल (उत्तर प्रदेश) २९:४७.४९; . २) कार्तिक कुमार (उत्तर प्रदेश) २९:४८.२१; . ३) अर्जुन कुमार (उत्तर प्रदेश) २९:४९.४६. ११०मी अडथळे : १. पी वीरमानी (तामिळनाडू) १४.५७ सेकंद; (२) , सीपी श्रीकांत मध्य (कर्नाटक) १४.८५; . ३) यशवंतकुमार लवेती (आंध्र प्रदेश) १५.०१. ३००० मी. स्टीपलचेस : १. अविनाश साबळे (महाराष्ट्र) ८:२०.२० २) शंकर लाल स्वामी (राजस्थान) ८:३४.३३; . ३) राजकुमार (हरियाणा) ८:४९.९६. उंच उडी : १. सर्वेश अनिल कुशारे (महाराष्ट्र) २.१५ मी. २) आदर्श राम (तामिळनाडू) २.१०; ३) जिओ जोस (केरळ) २.१० आणि सिद्धार्थ यादव (हरियाणा) २.१०. शॉट पुट: 1. ताजिंदरपालसिंग तोर (पंजाब) 20.58 मी. २) करणवीर सिंग १८.९८; . (३) , देविंदरसिंग (पंजाब) १८.०४. भालाफेक : १. नीरज चोप्रा (हरियाणा) ८७.८० मी. २) , यशवीर सिंग (हरियाणा) ७९.३१; (३) , रोहित यादव (उत्तर प्रदेश) ७८.८८.

महिला –

१००मी अडथळे : १. कनिमोळी (तामिळनाडू) १३.६३ सेकंद; २) आगासारा नंदिनी (तेलंगणा) १३.८८; . ३) आर. नित्या रामराजे (तामिळनाडू) १४.०८. 3000मी स्टीपलचेस : 1. पारुल चौधरी (उत्तर प्रदेश) 10:01.06; २) कोमल सी जगदाळे (महाराष्ट्र) १०:०५.४३; . (३) , चिंता यादव (उत्तर प्रदेश) १०:३६.४५ लांब उडी : १. प्रियांका केरकेट्टा (झारखंड) ६.१० मी. २) रिंटू मॅथ्यू (केरळ) ६.०७; . ३) शेरिन अब्दुल गफूर (तामिळनाडू) ६.०७.

डेकॅथलॉन : १. उसईद खान (उत्तर प्रदेश) ६८२० गुण २) नवजोर सिंग (पंजाब) ६६४९; 3; उमेश लांबा (राजस्थान) ६६३२