साहेबराव गायकवाड यांच्‍या मृत्‍युची सिबीआय चौकशी करावी – राधाकृष्‍ण विखे पाटील

0
415

लोणी दि.८ (पीसीबी) – पुण्‍याचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्‍या मृत्‍युची सिबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. गायकवाड यांच्‍या निधनामागे महसुल विभागातील बदल्‍यांमधील आर्थिक हितसंबधच कारणीभूत असल्‍याचा थेट आरोप त्‍यांनी केला.

अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे गुरुवारी निधन झाले, त्‍यांच्‍या मृत्‍युची वेगळीच कारणं आता समोर येत असल्‍याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील म्‍हणाले की, साता-यातुन ८ महिन्‍यांपुर्वीच पुण्‍यात बदली झाली होती. मात्र चारच दिवसात त्‍यांची पुन्‍हा पिंपरी चिंचवड येथे अचानक बदली करण्‍याचे असे कोणते कारण घडले असा सवाल करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, प्रशासनापुढे सध्‍या कोरोना या संकटाचे मोठे आव्‍हान असताना गायकवाड यांची बदली होणे हे शंकास्‍पद ठरते.

सध्‍या राज्‍य सरकारने प्रशासनातील सर्व बदल्‍यांना स्‍थगिती दिली असतानाही महसुल विभागातील विशिष्‍ट पदावर कार्यरत असलेल्‍या गायकवाड यांची बदली का करण्‍यात आली याची चौकशी करावी अशी मागणी करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की, यात मोठे आर्थिक हितसंबध गुंतले असल्‍याची चर्चा महसुल विभागातुनच पुढे आली आहे, या बदलीला गायकवाड यांनीच मॅटमध्‍ये दिलेल्‍या आव्‍हानाला स्‍थगितीही मिळाली होती. त्‍यामुळेच त्‍यांच्‍यावर कोणी दबाव आणला का याचीही चौकशी होणे गरजेचे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.