साहेबराव गायकवाड यांच्या बदलीची गरज होती का ? कुणाचा दबाव होता ? तो बडा नेता कोण ?

0
579

पुणे, दि. ८ (पीसीबी) – पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याच्या बातमीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका त्यांच्या बदली संदर्भात झालेल्या राजकारणामुळे आल्याचे बोलले जाते. याच्यात किती खरं किती खोटं हे नंतर ठरेल. परंतु या प्रकरणात नेमकं काय घडलं असावं याचा मात्र राज्य शासनाने तपास केलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. हे प्रकरण गंभीर असून ते आपण लावून धरणार असल्याचे त्यांनी `पीसीबी` शी बोलताना सांगितले.

कुंभार म्हणाले, यातील सगळ्यात महत्त्वाची बाब अगदी अलीकडे म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणजे ३० एप्रिल रोजी गायकवाड यांची बदली करण्यात आली. ३० एप्रिल म्हणजे कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावाचा काळातील अत्यंत जिकिरीचा काळ. असे असताना या काळात त्यांची बदली अचानक करण्याचे काय कारण होते ?. असंही नाही की गायकवाड यांची बदली फार वर्षांपासून प्रलंबित होती. अगदी अलीकडे म्हणजे सहा महिन्यापूर्वीत्यांची पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती. त्यामुळे त्यांची बदली लगेच करण्यामध्ये काय संयुक्तिक कारण होते?. त्यांच्या बदलीला सिविल सर्विसेस बोर्डाची मान्यता घेतली होती का?आणि सिविल सर्विसेस बोर्डाने मान्यता दिली असेल तर ती कशाच्या आधारावर दिली ?कोणकोणत्या नियमांचं पालन केलं गेलं ? आणि कोणते नियम डावलले गेले ?आणि ते का डावलले गेले ? याची चौकशी झाली पाहिजे.

आपल्या राज्यामध्ये बदली संदर्भात कायदा आहे. परंतु या कायद्याची पायमल्ली कशा पद्धतीने होते याचं गायकवाड यांची बदली म्हणजे हे एक उत्तम उदाहरण आहे. गायकवाड यांची बदली नियमित आणि सर्वांच्या सोबत झाली असेही नाही. गायकवाड यांच्या बदली संदर्भात जो आदेश आलेला आहे त्यामध्ये करण्यात आलेला उल्लेख ‘राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्या विषयीच्या कामकाजाचे गांभीर्य, तातडीची निकड व अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन सदर आदेश निर्गमित करण्यात येत आहेत’ असा आहे. म्हणजे नेमकं काय? म्हणजे गायकवाड यांचे कोरोनाव्हायरस संदर्भातील काम समाधान कारक नव्हतं असं म्हणायचं आहे का? आणि तसं असेल तर मग त्या संदर्भात त्यांच्याशी काय पत्रव्यवहार झाला किंवा त्यासंदर्भात काही चौकशी करण्यात आली का ? याचीही चौकशी झाली पाहिजे.

एकीकडे कोरोनाव्हायरस मुळे बदल्या आणि बढत्यांना स्थगिती दिल्याचे बोलले जात होते. मग फक्त गायकवाड यांच्या बदलीसाठी हा निर्णय बदलण्यात आला का? किंवा गायकवाड यांच्या बदलीनंतर मुळे बदल्या आणि बढत्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या बदलीला गायकवाड यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते आणि मॅटने त्यांच्या स्थगिती दिली होती. त्यानंतर गायकवाड यांनी काल (बुधवार) पुन्हा पदाचा चार्ज घेतला होता. मॅटमध्ये जाणे हे संघर्षाचे लक्षण समजले जाते. आणि अशा रीतीने वरिष्ठ अधिकारी बदली केल्याबद्दल बदलीला आव्हान देत असेल तर हे कोणत्याही अधिकाऱ्याच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची बाब असते. त्यामुळे गायकवाड यांच्यावर मॅट मधील प्रकरण जास्त ताणू नये ते ताणले गेल्यास काही अधिकाऱ्यांवर आणि शासनावर ताशेरे येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन कोणी दबाव आणला होता का? आणि त्या दबावामुळे गायकवाड यांना हृदय हृदय विकाराचा झटका बसला का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. मुळात कोरोनाव्हायरस लढण्यासाठी संपूर्ण राज्य लढत असताना गायकवाड यांच्या बदलीची गरज होती का आणि केली असेलच तर ती कुणाच्या दबावाने केली याची चौकशी व्हायला हवी.