साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

0
470

यवतमाळ, दि. ९ (पीसीबी) – प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे  उद्घाटकपदाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने मराठी साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले असतानाच साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पदाचा राजीनामा आज (बुधवार) दिला आहे.

जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून   दिला आहे. तसेच सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभार मानले आहेत. आता महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

यवतमाळमध्ये होणाऱ्या ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यात तीव्र मतभेद समोर आले आहेत. त्यातूनच संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

यावरून साहित्य वर्तुळातून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यापूर्वी  श्रीपाद जोशी यांनी साहित्यिकांशी चर्चा केली पाहिजे  होती, अशा शब्दात काही साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली होती. जोशींच्या या विचित्र निर्णयामुळे महामंडळाचे इतर सदस्य निष्कारण टीकेचे धनी ठरत आहेत, असेही काही साहित्यिकांनी म्हटले होते.