सावधान..!! रेमडेसिविर इंजेक्शनबाबत एक धक्कादायक माहिती

0
260

रायगड, दि.३० (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या 500 कुप्या पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर साधारण 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यात आले होते. यापैकी 90 रुग्णांना या इंजेक्शनमुळे दुष्परिणाम जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. इतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्याने आता अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरताना दिसून आले होते. मात्र, या ताज्या घटनेमुळे आता रेमडेसिविरच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा मोठ्याप्रमाणावर काळाबाजार होताना दिसत आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनमुळे कोरोनाच्या रुग्णांना खात्रीशीररित्या फायदा होईलच असे नाही, हे डॉक्टरांनी वेळोवेळी सांगूनही अनेकजण रेमडेसिविरच्या वापरासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी अचानक वाढली आहे.