सावधान; पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच वाहनाचा परवाना निलंबित होणार

0
4125

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओकडून नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारला जातो. मात्र दंड आकारूनही वाहचालकांवर फारसा परक पडत नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधित वाहनचालकाचा परवानाच निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवावा आणि आरटीओने परवाना निलंबित करावा, असे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडणाऱ्यांचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित होणार आहे.

अपघात रोखण्यासाठी सरकारने विविध विभागांमार्फत अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच विविध समित्यांचीही स्थापना केली आहे. एवढे करूनही रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होताना किंवा रोखण्यात यश येत नाही. त्यामुळे सरकारने आता अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी गंभीर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अपघात रोखण्यासाठी केवळ वाहतूक पोलिस आणि आरटीओंनाच जबाबदारी न देता या दोन विभागांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलिस, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रसिद्धी कार्यालयांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

यातील मुख्य जबाबदारी ही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची राहणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणारे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहून चालवणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे आणि क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे या पाच प्रकारांपैकी कोणताही वाहतूक नियम मोडला तर संबंधित वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठवतील. आरटीओ विभागाने वाहतूक पोलिसांच्या शिफारशीनुसार संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचप्रमाणे हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशात नमूद आहे.