औरंगाबाद येथील ‘आकांक्षा’ खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

0
1663

औरंगाबाद, दि. १८ (पीसीबी) – औरंगाबादमधील एमजीएम मेडिकल कॉलेजच्या आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा छडा लावण्यात सिडको पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी मजुराला उत्तर प्रदेश मधून अटक केली आहे.  

राहुल शर्मा (रा. उत्तर प्रदेश, दुद्धी सोनभद्रा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मजुराचे  नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.११) औरंगाबादमधील एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाचा हॉस्टेलमध्ये मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असावा अशी चर्चा होती. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. यावर सिडको पोलिसांनी तातडीने तपास चक्रर फिरवत चौकशीला सुरुवात केली.एमजीएम हॉस्टेलजवळच आणखी एका वसतिगृहाचे बांधकाम सुरु आहे. सुरुवातीला तिथल्या मजुरांची यादी पोलिसांनी घेतली. त्यातले काही मजूर बेपत्ता आहेत का हे देखील तपासले. त्यामुळे आरोपी राहुल शर्मा बेपत्ता असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले कि तो बऱ्याच दिवसांपासून हॉस्टेल जवळील सुरु असलेल्या बांधकाम साईटवर मजुराचे काम करत होता. सोमवारी (दि.१०) डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास तो चोरीच्या उद्देशाने बाजूच्या बांधकामाचा पत्रा उचकटून हॉस्टेलमध्ये घुसला. त्याने चोरीचा प्रयत्न केल्यावर आकांक्षाने विरोध केला. त्यानंतर त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, आकांक्षाचा विरोध वाढल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि गळ्यातील सोन्याची साखळी तोडून रेल्वेने गावी पळून गेला होता. औरंगाबाद पोलिसांनी त्याला अटक करुन सोमवारी रात्रीच शहरात आणले असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.