सातारचे पुराणीक पाकिस्तानात राबवतात हा उपक्रम

0
172

सातारा, दि. १ (पीसीबी) – सातारा जिल्ह्यातील एका कुटुंबाने आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. दिलीप पुराणिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या मराठी बांधवांचा शोध घेतला आहे. तिथल्या मराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी पुराणिक कुटुंब धडपड करत आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरी बसून नवनवीन गोष्टी केल्या. याच लॉकडाऊनमध्ये दिलीप पुराणिक यांनी चक्क पाकिस्तानमध्ये राहत असणाऱ्या तब्बल 500 मराठी कुटुंबांना शोधून काढलं. त्यानंतर मराठी भाषा शिकवण्याच्या या आगळावेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली.

पुराणिक कुटुंबियांनी इंटरनेटच्या मदतीने झूम मिटिंगद्वारे दर रविवारी मराठीची ऑनलाइन शिकवणी सुरु केली होती. आता हा उपक्रम मोहिम बनली आहे असून आता या उपक्रमाला मोठं यश मिळतं आहे. पाकिस्तानमधील बऱ्याच कुटुंबियांना मराठी भाषा शिकायची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा आता पुराणिक कुटुंबिय पूर्ण करत आहेत. इंटरनेटवर दर रविवारी ऑनलाइन क्लासेस घेतले जातात. या वर्गात पाकिस्तानातील मराठी लोकांचं कुटुंब आता येऊ लागलं आहे. त्यासोबतच या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा इतिहास शिकवला जाऊ लागला आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील मराठी बांधवांनाही आपल्या मातृभाषेविषयी प्रेम आणि आस्था आहे. त्यामुळेच त्यांची मराठी शिकण्याची धडपड स्पष्ट दिसत आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन सगळीकडे साजरा करण्यात आला. त्याचवेळी दिलीप पुराणिक यांनी कराची येथील मराठी बांधवांसोबत मराठी भाषा दिन ऑनलाईन साजरा केला आहे. या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी हे उपस्थित राहिले होते. दरम्यान पाकिस्तानमधील मराठी बांधवांचा नेमका काय इतिहास आहे हे अमोल कोल्हे यांनी कराची येथील मराठी बांधवांकडून जाणुन घेतलं.