साडी नेसवण्यास आईने नकार दिल्याने 13 वर्षीय मुलीची आत्महत्या

0
141

किवळे, दि. २२ (पीसीबी) – गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पांना घरी आणताना साडी नेसण्यासाठी मुलीने आईकडे हट्ट केला. मात्र मुलीला साडी नेसवण्यासाठी आईने नकार दिला. या रागातून मुलीने चक्क गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी दत्तनगर, किवळे येथे घडली.

सुश्मिता पिंटू प्रधान ( वय 13, रा, देहुरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुश्मिता, तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ असे तिघेजण लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करीत होते. गणेशाच्या आगमनाची सुष्मिताला मोठी उत्सुकता होती. त्यासाठी तिने सकाळीच आईकडे साडी नेसण्याचा हट्ट केला होता. साडी नेसून नटून थाटून तिला बाप्पांचे स्वागत करायचे होते. मात्र, एवढ्या सकाळी साडी नेसवण्यास आईने विरोध केला. त्यामुळे सुश्मिता नाराज झाली होती.

दरम्यान, दुपारी सुश्मिताची मावशी आणि काका घरी आले होते. त्यावेळी देखील सुश्मिताने साडी नेसण्याच्या आग्रह केला. एका विशिष्ट पद्धतीची साडी नेसण्यासाठी तिने हट्टच धरला. त्यावेळी कुटुंबीयांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुश्मिता चिडून बाथरूममध्ये गेली. बराच वेळ सुश्मिता बाहेर न आल्याने तिच्या मोठ्या बहिणीने बाथरूमचे दार ठोठावले. मात्र, सुश्मिताने आतून काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने बाहेर जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी तिला सुश्मिता लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडून सुश्मिताला खाली उतरवून तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी सुश्मिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.