सांगलीत ऐन निवडणुकीच्या काळात २० तलवारी जप्त; दोघांना अटक

0
638

सांगली, दि. ३ (पीसीबी) – ऐन निवडणुकीच्या काळात सांगलीच्या वाळवामधून तब्बल २० धारदार तलवारी सांगली पोलीस दलातील गुंडविरोधी पथकाने जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी सोमनाथ दिनकर पाटील आणि हणमंत काकासाहेब जाधव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी बेकायदा हत्यार बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री जिल्ह्यात ‘आपरेशन आलआऊट’ मोहिम राबविण्यात आले. या मोहिमेत गुंडविरोधी पथक सहभागी झाले होते. त्याचवेळी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना वाळवा येथे सोमनाथ पाटील आणि हणमंत जाधव यांच्याकडे तलवारींचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने मध्यरात्री दोघांच्या घरावर छापा टाकला. दोघांच्या घरांची झडती घेतली असता २० धारदार तलवारी सापडल्या.  या तलवारी ऑनलाईन मागविल्या असल्याची माहिती आरोपींनी दिली असून प्रत्येक एक तलवार त्यांना एक हजार रुपयाला मिळाली होती. आष्टा पोलीस अधिक तपास करत आहेत.