सहकारी गृहनिर्माण संस्थांनी परस्पर सहकार्याची भावना जोपासवी जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन !

0
188

पिंपरी,दि.०१(पीसीबी) – पुणे जिल्हा सह. गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाने सुवर्ण महोत्सवी वर्ष पदार्पण समारंभ पिंपळे सौदागार येथील हॉटेल गोविंद गार्डनच्या बांसूरी हॉलमधे आयोजित केला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक मा.श्री शत्रुघ्न काटे होते.

मुख्य अतिथि म्हणून श्री. संजय राऊत जिल्हा उपनिबंधक, पुणे जिल्हा, श्री नागनाथ कंजेरी,उपनिबंधक पुणे (३) आणि डॉ. शीतल पाटील उपनिबंधक पुणे (६) उपस्थित होते. सूत्रसंचालक चारुहास कुलकर्णी यांनी ह्या समारंभाची पार्श्वभूमी विषद केली. उपनिबंधक पुणे (३) व पुणे (६) यांच्या सहकार्याने आयोजित मानीव अभिहस्तांतरण अभियानाची माहिती दिली. पुणे जिल्हा महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी महासंघाने गेल्या ४९ वर्षात केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला आणि भविष्याच्या योजना थोडक्यात स्पष्ट केल्या. सहकारी गृहनिर्माण संस्थांना व त्यांच्या सभासदांना ज्या डिजिटल सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत त्यांचे थोडक्यात विवरण दिले आणि महासंघाने केलेल्या जनहित याचिकांची माहिती दिली. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया अॅड्व्होकेट मिलिंद डहाके यांनी थोडक्यात स्पष्ट केली.जिल्हा उपनिबंधक संजय राऊत ह्यांनी महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष पदार्पण समारंभाच्या निमित्ताने आयोजित मानीव अभिहस्तांतरण आणि सुव्यवस्थापन व तंटामुक्त संस्था अभियानाविषयी आपले विचार मांडले. सरकारने मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया सोपी केली असून कमीतकमी कागदपत्रे गोळा करावी लागतात असे संगितले.उपनिबंधकांच्या कार्यालयातून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी परस्पर सहकार्याची भावना ठेवल्याशिवाय संस्था तंटामुक्त होणार नाहीत असे सांगून प्रत्येक सोसायटीने तक्रार निवारण सल्लागार समिति स्थापन करून त्याची माहिती संबंधित उपनिबंधकांना न विसरता द्यावी असे आवाहन केले. अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना शत्रुघ्न काटे यांनी पिंपळे सौदागर मधे १७५ सोसायट्या असून त्यात ५० हजार पेक्षा जास्त व्यक्ति राहतात असे सांगून आपण दर शनिवार व रविवार सोसायट्यांच्या समस्या ऐकतो आणि सोमवार ते शुक्रवार त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करत असतो असे सांगितले.सोसायट्यांमधील वाद हे मुख्यतः इगो मुळे निर्माण होतात असे त्यांचे निरीक्षण त्यांनी उदाहरणे देऊन ते स्पष्ट केले. सभासदांनी इगो न ठेवता मदतीचा व सहकार्याचा हात पुढे केला आणि कमिटीने सुद्धा नियमाने व पारदर्शी काम केले तर सोसायट्या तंटामुक्त होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास शत्रुघ्न काटे ह्यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्हा महासंघाचे सुहास पटवर्धन आणि जिल्हा उपनिबंधक संजय राऊत ह्यांनी उपस्थित सोसायट्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. वेळेअभावी ज्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत त्यांनी ७ ऑक्टोबर रोजी पिंपळे सौदागरमधे गणेश रेसिडन्सी मधे होणार्‍या सहकार दरबारात हजर राहून मार्गदर्शन घ्यावे असे चारुहास कुलकर्णी यांनी जाहीर केले. चिखली शाखेच्या आशिष सातकर ह्यांनी आभार प्रदर्शन केले. चिंचवड शाखेच्या सुभाष कर्णिक ह्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

समारंभास पिंपरी चिंचवड शहरातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांचे २०० प्रतिनिधी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड मधील ज्या संस्थांचे अभिहस्तांतरण झालेले नाही त्यांनी आणलेले मानीव अभिहस्तांतरण प्रस्ताव उपनिबंधक पुणे (३) व पुणे (६) यांच्या अधिकार्‍यांनी स्विकारले.