“सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे”

0
177

नवी दिल्ली, दि.२१(पीसीबी) : दोन कृषि विधेयक मंजूर करताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ माजला होता. सभागृहात घोषणाबाजी करत काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी बाकांवरील काही खासदारांनी दोन्ही कायद्यांना विरोध करत प्रचंड गोंधळ घातला होता. या गोंधळाप्रकरणी राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी काँग्रेसच्या तीन खासदारांसह आठ खासदारांना निलंबित केलं गेलं आहे. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता या निलंबनाच्या कारवाईवरून मोदी सरकारविरोधात चीड व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी विधेयकं मंजुरीसाठी मांडण्यात आल्यानंतर सभापतींच्या हौद्यासमोर येऊन गोंधळ घातला होता. यावेळी केलेल्या गैरवर्तनावरून सभापतींनी आठ खासदारांचं एका आठवड्यासाठी निलंबन केलं. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे राजीव सातव, रिपून बोरा आणि सय्यद नासिर हुससैन, सीपीआय (एम)चे के. के. रागेश आणि एल्मलारन करीम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली जातील.

या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी चीड व्यक्त करत ट्विट केले. सरकारवर टीका करताना “लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच आहे. सुरूवातीला आवाज दाबला गेला. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.