समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

0
53

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून महापालिकेच्या २५०० महिला कर्मचारी आणि शहरातील सुमारे ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार ९ मार्च रोजी चिंचवडमधील एल्प्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये “लापता लेडीज” चित्रपटाचे मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत.

महिला कर्मचारी व पत्रकार महिलांचे त्यांच्या योगदानासाठी कौतुक करणे व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमामध्ये महिलांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ९.३० पासून चित्रपट प्रदर्शित होणार असून दोन स्क्रिनवरती ९ शो चे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान सकाळी ९ वाजता,दुपारी १२ आणि ३.३० वाजता तसेच सायंकाळी ६.३० आणि रात्री ९.३० या शो च्या वेळा आहेत. याव्यतिरिक्त, चित्रपटादरम्यान सर्व उपस्थित महिलांना मोफत पॉपकॉर्न प्रदान केले जाणार असून महिलांना चित्रपटगृहामधील पार्किंग सुविधा सुध्दा मोफत उपलब्ध असणार आहे.

महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे..
“महापालिकेच्या महिला कर्मचारी आणि शहरातील महिला पत्रकारांच्या योगदानाबद्दल कौतुक करण्यासाठी विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करताना आनंद होत आहे. महिलांचे कर्तृत्व ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिलांचे आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशीच कौतूक न करता दररोज तो साजरा करणे गरजेचे आहे. शनिवारी चित्रपटाच्या एका शो साठी माझी पत्नी, ईशा आणि मी देखील उपस्थित राहणार आहोत.”

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका