सनई चौघडे वाजणार; किर्लोस्करांची लेक टाटांची सून होणार   

0
845

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –   भारतातील  आघाडीचे  उद्योगपती टाटा आणि किर्लोस्कर  या घराण्यात  नवी सोयरीक होणार आहे.  रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा पुत्र नेविल आणि विक्रम किर्लोस्कर यांची कन्या मानसी यांचा साखरपुडा  नुकताच झाला.  लवकरच नेविल आणि मानसी विवाहबंधनात अडकणार आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि पीरामल कुटुंबांमध्ये  सोयरीक झाली आहे. त्यानंतर आता टाटा आणि किर्लोस्कर एकमेकांचे सगेसोयरे होणार आहेत. नेविल यांनी किर्लोस्कर यांच्या बंगळुरु येथील घरी जाऊन मानसीसाठी लग्नाची मागणी घातली. त्यानंतर मुंबईत टाटा कुटुंबियांच्या घरी साखरपुडा  झाला.  याच वर्षी दोघांचा विवाह होण्याची शक्यता आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

नोएल टाटा ट्रेंटचे चेअरमन आहेत तसेच ते टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.  ते प्रसार  माध्यमांपासून  दूर राहणे पसंत करतात. नोएल टाटा यांना नेविल हा एक मुलगा तर लेह आणि माया या दोन मुली आहेत. तर विक्रम किर्लोस्कर हे टोयाटो किर्लोस्कर मोटरचे व्हाईस चेअरमन आहेत.  मानसी किर्लोस्कर ही सिस्टम विभागात कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहे.