‘संतपीठ म्हणजे राजकीय कुस्तीचा आखाडा नव्हे; तज्ञांचा अवमान नको!’

0
640

पिंपरी, दि.०९ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिले संतपीठ टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत आहे. पण, संतपीठाची पहिली वीट बसली आणि राजकीय श्रेयवादासह हेवेदावे सुरू झाले. देशातील प्रभावशाली सनदी अधिकारी असलेले महापालिका आयुक्त राजेश पाटील या संतपीठाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यासह तज्ञ मंडळींच्या भूमिकेवर संशय निर्माण करणे योग्य होणार नाही. कारण, संतपीठ म्हणजे राजकीय कुस्तीचा आखाडा नाही. हा वारकरी सांप्रदाय आणि अध्यात्मासाठी वाहून घेतलेल्या त्या-त्या क्षेत्रातील प्रतिभावंतांचा अवमान आहे. राजकीय विकृत मनोवृत्तीतून हे पाप शहरातील राजकीय मंडळी करीत आहेत.

संतपीठाच्या सीबीएसई शाळेची प्रवेश प्रक्रिया १४ जुलैपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राजकीय श्रेयवाद आणि हेवेदावे सुरु झाले आहेत. सीबीएसईच्या स्कूलसाठी १५ हजार कशासाठी? महापालिका पैसे उकळण्याचा धंद करीत आहे. याहून पुढे संत तुकोबाच्या नावाने पैसे कमावण्याचा प्रयत्न… असे अनेक निराधार आरोप आणि चिखलफेक सुरू झाली आहे.
त्यामुळे संचालक मंडळाचे अध्यक्ष आयुक्त राजेश पाटील, संचालक प्रा. डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प. राजू महाराज ढोरे, स्वाती मुळ्ये, सल्लागार प्रा. अभय टिळक या तज्ञ आणि निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण,
‘‘बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ।।३।।

या संतश्रेष्ठ तुकोबांच्या मताशी संचालक मंडळाने ठाम रहावे. तुमच्या निरपेक्ष भूमिकेशी आम्ही पिंपरी-चिंचवडकर सहमत आहोत. संचालक मंडळ आणि त्यामधील तज्ञांवर आमचा विश्वास आहे.
ज्या महापालिका आयुक्तांनी पेपर विकून ‘आयएएस’ ची परीक्षा उत्तीर्ण केली. देशभरात स्वत:ची ओळख निर्माण केली. ते राजेश पाटील संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे दहावे वंशज असलेले प्रा. डॉ. सदानंद मोरे संचालक आहेत. यासह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत. आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा. अभय टिळक सल्लागार आहेत. ह.भ.प. राजू महाराज ढोरे आणि शिक्षणतज्ञ स्वाती मुळ्ये यांचा या सल्लागार मंडळात समावेश आहे. या मंडळातील एकही व्यक्ती राजकीय पार्श्वभूमीची नाही. या संचालक मंडळाने एकत्रित बसून संतपीठ आणि सीबीएसई शाळेचा आराखडा तयार केला. त्यांच्या हेतूवर संशय निर्माण करीत संतपीठाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

*१५ हजारात सीबीएसईसह वारकरी सांप्रदाय शिक्षण मिळत असेल तर स्वागतच…
पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यातील नामांकीत शिक्षणसंस्था याव्यात अशी प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे. आजच्या घडीला शहरातील कोणत्याही सीबीएसई शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल, तर किमान ६० हजार रुपये इतके शालेय शुल्क भरावे लागते. अत्याधुनिक शिक्षण आणि वारकारी सांप्रदायासह सीबीएसईचे शिक्षण १५ हजार रुपयांच्या शुल्कात मिळत असेल, तर ही बाब स्वागतार्हच आहे. मोफत शिक्षणाचे दाखले देत १५ हजार रुपयांच्या शुल्क आकारणीवर गळे काढणाऱ्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. ते १५ हजार रुपयांमध्ये परवडणारे नाही, अशी पुष्टी दिली आहे. पण, ज्या संतपीठाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आयुक्त राजेश पाटील आहेत. ते पेपर विकून संघर्षातून सनदी अधिकारी झाले आहेत. तेच राजेश पाटील सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळू नये, अशी भूमिका घेतील का? याचा विचार झाला पाहिजे.

*आमदार महेश लांडगे यांची भूमिका चूक कशी?
संतपीठाच्या कामाचे श्रेय आमदार महेश लांडगे यांना मिळत आहे. ही बाब राजकीय विरोधक आणि विरोधी पक्षाला पचणारी नाही. वास्तविक, २०१५ मध्ये संतपीठ ही संकल्पना पुढे आली. २०१६ मध्ये महासभेची मान्यता मिळाली. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आली. तत्पूर्वी, २०१४ मध्ये महेश लांडगे भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले होते. भोसरी व्हीजन-२०२० मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची घोषणाही केली होती. संचालक मंडळाची निर्मिती भाजपाच्या काळात झाली. यामध्ये राजकीय व्यक्ती नसावी, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्यामध्येही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तज्ञ संचालक मंडळ संपपीठाच्या कामकाजाचा आराखडा तयार करीत आहे. मग, आमदार आणि नंतर महापालिका सत्तेच्या काळात संतपीठाच्या कामासाठी पुढाकार घेतला ही आमदार लांडगेंची चूक झाली का? असा प्रश्न उपस्थित होतो. याउलट, पिंपरी-चिंचवडकरांना श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहूच्या सानिध्यात असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये संतपीठ साकारले जातेय, याचा अभिमान वाटतो.
संतपीठात संत साहित्याचे धडे सुरू होण्यापूर्वीच काही प्रवृत्तींनी साप-साप म्हणून भूई धोपाट्याची कृती सुरू केली आहे. एखाद्या शुभप्रसंगात अशुभ काम करणाऱ्यांचे काय करावे? हे स्वत: तुकोबा सांगतात…
मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥१॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचें तोंड ॥२॥
समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥३॥
तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥४॥
याचा अर्थ असा होतो, एका विवाही प्रसंगी नवरा-नवरी वेळेवर आले नाहीत म्हणून एक म्हातारा मधे बोलू लागला. नवरा वेळेवर येत नाही हे पाहुन तो म्हातारा त्या नवरीला ‘त्या रांडेला आना’ आणि त्या ‘नावर्याचे तोड़ पेंटून दया’ अशी अशुभ वार्ता करू लागला. कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हाताऱ्याला कळाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आशा मुर्ख म्हाताऱ्याला मंडवातून प्रथम दूर करा.

आणि हेच काम पिंपरी-चिंचवडकर यापुढील काळात करतील. त्यामुळे वारकारी सांप्रदायाच्या शिक्षणाची पताका देश-विदेशात जात असताना, आंतराष्ट्रीय दर्जावर शहराचा लौकीक होत असताना राजकीय भावनेतून दूधात मिठाचा खडा टाकणाऱ्यांनी भानावर आले पाहिजे.