श्रीनगरमधील भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

0
278

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : श्रीनगरमधील नवाकदल परिसरात काल (सोमवारी) रात्री भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत किती दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परिसरात भारतीय सैन्यदलाच्या वतीने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. त्यानंतर श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी झाली होती चकमक
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारतीय सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला होता. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांना डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच, त्यांनी डोडा शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर गुंडाना परिसरात असलेल्या पोस्ता-पोत्रा गावात एक सर्च ऑपरेशन चालवलं.

त्यांनी सांगितलं होतं की, लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये सैन्यदलातील एक जवान गंभीर जखमी झाला असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच तो शहीद झाला होता. पुढे बोलताना अधिकारी म्हणाले की, सेना राष्ट्रीय रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने एका घरात संशयित दहशतवादी असल्याची माहिती मिळताच हे सर्च ऑपरेशन चालवलं होतं.

हिजबुल दहशतवाद्याला अटक
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सक्रीय असलेल्या हिजबुलच्या दहशतवाद्याला भारतीय सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याकडे एक बंदूक सापडली होती. टटना शेखापुरा भागात एक दशहतवादी लपलेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं.

भारतीय सुरक्षा रक्षक, निमलष्करी दल आणि जम्मू आणि पोलीस यांच्या मार्फत हे सर्च ऑपरेशन चालवलं. दहशतवाद्याला चारही बाजून घरण्यात आलं. या वेळी दहशतवाद्याने पळ काढताना त्याला अटक करण्यात आली होती