श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व; तर नगराध्यक्षपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोटे विजयी       

0
851

अहमदनगर, दि. २८ (पीसीबी) – श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीची आज (सोमवार)  मतमोजणी झाली.  भाजपने १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा  जिंकण्यात यश मिळाले आहे.  तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे  यांनी बाजी मारली आहे.

रविवारी (दि.२७) श्रीगोंदा  नगरपरिषदेसाठी मतदान झाले होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली  होती. १९ नगरसेवक आणि   नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत ७१ उमेदवार रिंगणात उतरले होते. १९ नगरसेवकांपैकी १० जागा महिलांसाठी राखीव आहेत.

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यामध्ये भाजपकडून सुनीता शिंदे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून शुभांगी पोटे आणि संभाजी ब्रिगेडकडून सिराबजी कुरेशी या रिंगणात उतरल्या होत्या.  अखेर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे यांनी बाजी मारत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.