शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात; दानवेंचे युतीबाबत सुचक विधान

0
823

सोलापूर, दि. १६ (पीसीबी) – समविचारी पक्षांना सोबत घेऊन मतांचे विभाजन टाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतविभागणीचा फायदा होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले.

आज (बुधवारी) सोलापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक जसजशा जवळ येतील तसतसे चित्र स्पष्ट होईल.  राजकारणात कोणताही अल्टिमेटम नसतो, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात, असेही सुचक विधान दानवे यांनी युतीबाबत केले आहे.

ते पुढे म्हणाले की, एनडीएतील घटक पक्षांनी एकत्र  राहून निवडणूक लढवाव्यात, अशी  आमची भूमिका आहे. भाजप गरज पडेल तेथे मवाळ आणि गरज पडेल तेथे ताठर आहे, असेही दानवे यांनी सांगितले.   राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. राज्यात १० हजार सरपंच, १८ मनपा, १० झेडपी, ९० नगरपालिका , २३ खासदार, १२३ आमदार आणि एक मुख्यमंत्री इतके पाठबळ भाजपच्या पाठीशी आहे. या बळावर आगामी   निवडणूक भाजप जिंकेल, असा विश्वासही  दानवे यांनी यावेळी  व्यक्त केला.