शेतकऱ्यांनो, वीजबिलांच्या थकबाकीमधील ६६ टक्के सवलतीसाठी उरले “एवढेच” दिवस

0
506

– पश्चिम महाराष्ट्रातील ६१ टक्के शेतकऱ्यांचा सहभाग

पुणे, दि. २८ (पीसीबी) : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत घेऊन कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यातील ५० टक्के सवलत घेण्याची मुदत येत्या ३१ मार्चला संपत आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील ७ लाख ६८ हजार ६९७ (६१ टक्के) शेतकऱ्यांनी सहभाग घेत तब्बल १९२८ कोटी रुपयांची थकबाकीमध्ये सवलत मिळविली आहे. तर २ लाख ३९ हजार ६९७ शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात १२ लाख ५३ हजार ९९६ शेतकऱ्यांकडे १० हजार ८५१ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफी, व महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण २६४७ कोटी ४२ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. यासह वीजबिल दुरुस्ती समायोजनाने २७१ कोटी ९३ लाख रुपयांनी थकीत रक्कम आणखी कमी होऊन सुधारित थकबाकी आता ७९३२ कोटी ३५ लाख रुपये झाली आहे. त्यापैकी फक्त ५० टक्के रकमेचा व चालू वीजबिलाचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल ३९६६ कोटी १७ लाख रुपयांची सवलत मिळणार आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील या धोरणातून पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २ लाख ३९ हजार ६९७ शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत वीजबिल संपूर्ण कोरे केले आहे. या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचा एकूण ६२८ कोटी १४ लाख रुपयांचा भरणा केला व थकबाकीमुक्ती मिळविली. त्यांना उर्वरित ५० टक्के थकबाकीची म्हणजे ३८७ कोटी ६७ लाखांची रक्कम माफ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील ४४ हजार ७३३, सांगली- ३५ हजार ६३३, सातारा- ७१ हजार ८१६, सोलापूर- १२ हजार ९६६ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ७४ हजार ५४९ शेतकरी वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत ७ लाख ६८ हजार ६९७ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ७१६ कोटी रुपयांचे चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीपोटी ५२० कोटी रुपयांचा भरणा केला आहे. योजनेनुसार या सर्व शेतकऱ्यांचे व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट आणि थकबाकीच्या भरलेल्या रकमेएवढीच सूट असे एकूण १२३६ कोटी रुपये माफ करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार १६३, सोलापूर- २ लाख ३३ हजार ६२६, सांगली- १ लाख २२ हजार ४७, कोल्हापूर- १ लाख १२ हजार ४२१ आणि सातारा जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ४४० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग घेतला आहे.

कृषिपंपाचे चालू वीजबिल व थकबाकीच्या भरण्यामधून आतापर्यंत एकूण १०१२ कोटी रुपयांचा कृषी आकस्मिक निधी आतापर्यंत जमा झालेला आहे. यामध्ये पुणे जिल्हयात २६६ कोटी ६० लाख, सातारा- २३० कोटी ५० लाख, सांगली- १९३ कोटी ७६ लाख, सोलापूर- १७८ कोटी ३० लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात १४२ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. या निधीमधून जिल्हा व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी नवीन उपकेंद्र, उपकेंद्रांची क्षमतावाढ, नवीन वितरण रोहित्रे, वीजवाहिन्या आदींचे काम करण्यात येत आहेत. त्यासाठी आतापर्यंत ३७९ कोटी रुपये खर्चाची १० हजार २५५ कामांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून १६३ कोटी रुपयांच्या ८२०१ कामांचे आदेश देण्यात आले आहे. आतापर्यंत १७६० कामे पूर्ण झाली असून ६४४१ कामे प्रगतिपथावर आहेत.