शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याने तरुणाच्या ओठाचा चावा

0
309

सांगवी, दि. २ (पीसीबी) – एकजण तरुणाला विनाकारण शिवीगाळ करत होता, त्याचा जाब विचारल्याने एकाने तरुणाच्या ओठाजवळ चावा घेऊन त्याला जखमी केले. तसेच तरुणाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १) दुपारी सव्वादोन वाजता जुनी सांगवी येथे घडली.

अनिकेत अशोक कांबळे (वय २४, रा. जुनी सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सँडी उर्फ संदेश राजेंद्र कांबळे (वय २०), राजेंद्र तुकाराम कांबळे (वय ५२), संतोष श्रीमंत कांबळे (वय ३२, सर्व रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता आरोपी सँडी हा फिर्यादी यांना विनाकारण शिवीगाळ करत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला शिव्या का देतो, असा जाब विचारला.

त्यावरून सँडी याने फिर्यादी यांना शिवीगाळ, मारहाण करत ओठाजवळ चावा घेतला. त्यानंतर आरोपी राजेंद्र आणि संतोष यांनी फिर्यादी यांना लाकडी बांबूने मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.