“शिवसैनिक रडका नसतो, तो लढणारा असतो. सेनेच्या नेत्याला फडणवीस फोडून गेले”; राऊतांचा हल्लाबोल

0
350

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. त्यांनी आज चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी कालच सेना सोडण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आणि जाताना सेनेच्या नेत्याला फोडून गेले. साबणेंचा पक्षप्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. शिवसैनिक रडका नसतो, तो लढणारा असतो, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी साबणेंवर हल्लाबोल केला आहे.

“शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय”, असं म्हणत सुभाष साबणे यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. चव्हाणांच्या एकाधिकारशाहीमुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढणार नाही किंबहुना अशोक चव्हाण वाढू देणार नाही, असंही साबणे म्हणाले होते. त्यावर आज संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, ‘शिवसैनिक रडका नसतो, तो लढणारा असतो’, एवढ्या सहा शब्दात राऊतांनी साबणेंवर प्रहार केला.

दुसरीकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या फडणवीसांनी नाराज सुभाष साबणे यांची भेट घेतली. पुढच्या काही तासांत साबणेंनी देखील सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजप प्रवेशाची घोषणा केली. या सगळ्या प्रकारावरही राऊतांनी संताप व्यक्त केला. “शेतक-यांच दु:ख समजून घ्यायला गेले होते की शिवसेना आमदाराला फोडायला गेले होते?, असा संतप्त सवाल राऊतांनी फडणवीसांना विचारला.

भाजपने आमचा माणूस घेतला. तोही रडका… शिवसैनिक रडत नाही तर लढतो, भाजप दुसऱ्यांची लोकं घेतंय, सूज लपवून ठेवायची असा हा प्रकार आहे. त्यांच्याकडे माणसंच नाहीत, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला.

देगलूर इथे आज भाजप मेळावा पार पडला. याच मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साबणे यांचा पक्ष प्रवेश झालाय. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साबणे यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांची पोट निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलीय. दरम्यान साबणे यांच्या पक्ष प्रवेशाला मोठी गर्दी जमल्याचे दिसून आलं.

सुभाष साबणे यांना शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीनं हुंदका दाटून आला. शिवसेनेतील आठवणी सांगताना सुभाष साबणे यांना अश्रू अनावर झाले. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.