पुण्यातील ‘त्या’ रुग्णालयाकडून किडनीग्रस्त रुग्णांची हेळसांड; आमदार लक्ष्मण जगतापांनी केली चौकशीची मागणी

0
228

पिंपरी, दि.४ (पीसीबी) : पुणे शहरातील जहांगीर धर्मादाय रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना “आधी पैसे भरा, त्यानंतरच प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाईल, असे तेथील सर्जन डॉ. श्रीनिवास अंबिके यांच्याकडून सांगितले जात आहे. पैसे न भरणाऱ्या रुग्णांवर उपचार नाकारले जात आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, धर्मादाय रुग्णालयांमार्फत होणाऱ्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाकरिता ठराविक दर निश्‍चित करून एक आदर्श नियमावली लागू करावी. तसेच राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा तातडीचा निर्णय घेऊन किडनी आजाराने ग्रस्त गोरगरीब रूग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जहांगीर धर्मादाय रुग्णालय हे पुण्यातील मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात किडीनीच्या आजाराने ग्रस्त असलेले शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून व गावखेड्यातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची नितांत गरज असते. परंतु जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आधी पैसे भरा, त्यानंतरच आम्ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करू, असे उत्तर सर्जन डॉ. श्रीनिवास अंबिके यांच्याकडून दिले जात आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लांबवले जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.

गेल्या वर्षी पुण्याचे धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी पुणे व पिंपरी चिंचवड हॉस्पिटल असोसिएशन तसेच जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद व इतर वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पुण्यात एक बैठक पार पडली होती. या बैठकीत धर्मादाय रुग्णालयांना पैशाअभावी कुठल्याही रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया थांबविता येणार नाही, असे आदेश देण्यात आले होते. अशा रुग्णांवर पीएमओ, सीएमआरएफ, विविध सामाजिक संस्था आणि धर्मादाय आयुक्तांच्या वतीने आयपीएफमध्ये समाविष्ट करून प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.

परंतु, जहांगीर रुग्णालय धर्मादाय आयुक्तांचा आदेश मानत नसल्याचे चित्र दिसत आहे. जहांगीर रुग्णालयाची भूमिका ही रुग्णांना मदत करण्याऐवजी त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार देऊन मनस्ताप होण्यासाठी भाग पाडत असल्याचे अनेक प्रकार निदर्शनास येत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मानून समाजात गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत करण्याचा धर्मादाय रुग्णालयांचे कर्तव्य असताना जहांगीर रुग्णालय हे रुग्णांना धर्मादाय शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ठेऊन रुग्णांची हेळसांड करत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करत ऐनवेळी शस्त्रक्रिया करण्यास नकार देत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन धर्मादाय रुग्णालयांमार्फत होणाऱ्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी ठराविक दर निश्‍चित करून एक आदर्श नियमावली लागू करावी. तसेच सर्व धर्मादाय रुग्णालयांवर अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनाही लागू करणेबाबत तातडीने आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित केल्यास किडनी आजाराने ग्रस्त गोरगरीब रूग्णांवर वेळेत उपचार होतील. त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून उपचार थांबणार नाहीत. आपण या प्रकरणात गोरगरीब रुग्णांना न्याय व दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे जहांगीर धर्मादाय रुग्णालयाच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रक्रियेची उच्चस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी. या रुग्णालयाच्या वैद्यकीय बिलांचे सक्षम यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.