शिवसेनेसोबत युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार – रावसाहेब दानवे

0
526

जालना, दि. २९ (पीसीबी) –  आम्हाला शिवसेनेसोबत युती करायची आहे, असे सांगून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना-भाजप युतीबाबतची भाजपची भूमिका आज स्पष्ट केली आहे. लोकसभेच्या तोंडावर जालन्यात आज भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दानवे यांनी युतीबाबतची माहिती दिली.

दानवे म्हणाले की, “आम्हाला शिवसेनेसोबत युती हवी आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेनेने घ्यावा. आमचा राज्यातल्या सर्व ४८ मतदारसंघाचा आढावा पूर्ण झाला आहे. आम्ही रायगड आणि रत्नागिरी सोडून राज्यातल्या सर्व मतदारसंघांचे दौरे पूर्ण केले आहेत. आमच्याकडे प्रत्येक मतदार संघात उमेदवार आहेत. तरिही आम्ही शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चा करायला शेवटपर्यंत तयार आहोत.”

दानवे म्हणाले की, “निवडणुकीला अद्याप बराच वेळ आहे, उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत आम्ही युतीसाठी प्रयत्न करत राहणार आहोत. अद्याप आमच्यात युतीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही, युतीचा प्रस्तावही नाही. युतीच्या चर्चेसाठी कोणते-नेते असतात हे मला चांगले माहीत आहे. त्यामुळे आमच्या प्रयत्नांना यश येईल.”