कामगार चळवळीचे पितामह जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

0
944

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – ‘आवाज कुणाचा…’ या घोषवाक्याला ‘कामगारांचा…’ असे निर्विवाद उत्तर देणारे देशातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित ‘बंदसम्राट’ व देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक व्याधींशी झुंजणाऱ्या फर्नांडिस यांच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स रूग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फर्नांडिस यांच्या निधनामुळे देशातील कामगारांसाठी प्राणपणाने झुंजणारा ‘योद्धा’ हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते. संपूर्ण देशाचे समाजकारण व राजकारण त्यांनी व्यापून टाकले होते. ३ जून १९३० रोजी जन्मलेले जॉर्ज बालपणापासूनच चळवळ्या व बंडखोर स्वभावाचे होते. या स्वभावामुळेच पाद्री होण्यासाठी चर्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या जॉर्ज यांनी तिथून पळ काढला. पुढे ते कामगार चळवळीत सक्रिय झाले. १९७४च्या रेल्वे संपापासून जॉर्ज खऱ्या अर्थाने नेते म्हणून उदयास आले. आणीबाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या देशाने पाहिला. आणीबाणीच्या काळात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी राखून आणि पगडी घालून शीख सरदाराचा वेष धारण केला होता. अटकेनंतर तुरुंगात ते कैद्यांना भगवद्गीतेचे श्लोक म्हणून दाखवायचे.

आणीबाणी उठल्यानंतर जॉर्ज यांनी तुरुंगात असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्या काळात काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या काळात ते उद्योगमंत्री होते. जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी स्वत:चे वेगळे पक्ष काढले. जॉर्ज यांनी समता पार्टीची स्थापना करून सक्रिय राजकारण सुरू केले. अर्थात, राजकारण करत असतानाही कामगारांशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. कामगारांसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले. त्यांचे राजकारण कधी कामगारहिताच्या आड आले नाही. कामगार संघटनांचं नेतृत्व करताना जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते घडले. या नेत्यांनीही पुढं जॉर्ज यांचा वारसा समर्थपणे सुरू ठेवून कामगारांना न्याय्यहक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. भाजपशी जवळीक साधण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीकाही झाली. मात्र, ते डगमगले नाहीत. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी भारतीय जवानांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले होते.