शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, १६ खाती देण्याची भाजपाची तयारी-सूत्र

0
453

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरुन निर्माण झालेला प्रश्न हा सुटण्याचा मार्ग काही सुकर होताना दिसत नाही. लवकरच नवे सरकार स्थापन होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. केंद्र सरकारकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आराखडाही सोपवला असेही समजते आहे. दरम्यान भाजपाने शिवसेनेला १६ मंत्रिपदांची ऑफर दिली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपाने मान्य केलेली नाही असेही सूत्रांच्या माहितीनुसार समजतं आहे. असं असल्याने आता शिवसेनेच्या कोर्टात चेंडू आहे असे समजते आहे. त्यामुळे आता तरी हा पेच सुटेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १७ खाती हवी आहेत. ज्यामध्ये गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. मात्र भाजपाने १६ खाती देण्यावर सहमती दर्शवली असून त्यामध्ये गृह, अर्थ आणि नगरविकास खाती नाहीत. महसूल मंत्रीपद शिवसेनेला दाखवण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे असंही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने अडीच वर्षांसाठी दावा सांगितला आहे. त्याचमुळे चर्चेचे घोडे अडले आहे. आता १६ मंत्रिपदांच्या ऑफरनंतर चर्चा सुरु होणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेची भूमिका मांडत संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेत आहेत आणि मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. तसंच शिवसेनेला सगळं काही समसमान ठरल्याप्रमाणे हवे आहे असंही ते सांगत आहेत. आता शिवसेनेचे काय ठरणार? सत्तास्थापनेची कोंडी फुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.