शिवसेनेच्या भूमिकेशी आम्ही कधीही सहमत नव्हतो आणि नाही – राधाकृष्ण विखे पाटील

0
557

मुंबई, दि. २ (पीसीबी) – भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे, या शिवसेनेच्या भूमिकेशी आम्ही कधीही सहमत नव्हतो आणि नाही, असे काँग्रेस नेते आणि  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले   आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेसला कोणताही प्रस्ताव दिला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या भूमिकेशी आम्ही कदापी सहमत नाही. त्यामुळे कदम यांचे विधान फारसे गांभिर्याने घ्यावसे वाटत नाही, असेही  विखे-पाटील यांनी म्हटले आहे. नगर महापालिकेमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिवसेनेचा महापौर झाला नव्हता. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट कदम यांनी केला होता.

अहमदनगर महापालिकेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी यांची आघाडी करण्याचे  प्रयत्न सुरू  होते, असा गौप्यस्फोट  रामदास कदम  यांनी  केला होता. या आघाडीसाठी मी स्वतः  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, असे कदम यांनी म्हटले होते. या विधानावर विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.