शिरूर लोकसभा मतदारसंघातून २३ उमेदवार रिंगणात; तीन जणांची माघार

0
699

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) –  शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी  २६ जणांनी आपले  उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता  शिरूरच्या रिंगणात एकूण २३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. अर्ज माघारी घेण्याचा आज (शुक्रवार) अखेर दिवस होता.

शिरूर  लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत एकूण २६ जणांनी आपले अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केले होते. त्यापैकी तीन जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

अर्ज माघारी घेण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत डॉ. मिलिंदराजे भोसले, अॅड. अनिल बाबू सोनावणे, अल्ताफ करीम शेख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

दरम्यान, शिरूरच्या रिंगणात २३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. तरी खरी लढत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्येच होणार आहे.