शिरुरमध्ये कोणी कितीही कोल्हेकुई केली, तरी आपणच जिंकणार; शिवाजीराव आढळरावांचा अमोल कोल्हेंवर निशाणा  

0
658

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – शिरुर लोकसभा मतदारसंघात कोणी कितीही कोल्हेकुई केली, तरी आगामी लोकसभा निवडणूक आपणच जिंकणारच, असा ठाम विश्वास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी  केला आहे. प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कोल्हे शिरुरमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आढळरावांनी निशाणा साधला आहे.  

आढळराव पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नव्हे, तर माळी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. गेल्या १५ वर्षात या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळालेला नाही, असे  टीकास्त्र  आढळरावांनी सोडले.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरचे विद्यमान खासदार आहेत. आढळराव सलग तीन टर्म शिरूर मतदासंघातून शिवसेनेकडून प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१४ मधील निवडणुकीत ३ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तेच शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. पण अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीत एंट्री झाल्याने लांडेंची अस्वस्थता वाढली आहे.