शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा सख्खा भाऊ ईडी च्या ताब्यात

0
181

दापोली, दि. ११ (पीसीबी) – साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचं समजत आहे. सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. तसेच शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कथित बेकायदा साई रिसॉर्ट्स बांधकाम प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी व्यावसायिक सदानंद कदम यांनी ताब्यात घेतले आहे. कदम हे सत्ताधारी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू आणि विरोधी पक्ष शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब यांचे माजी सहकारी आहेत. या रिसॉर्ट्स प्रकरणाच्या पुढील तपासासाठी ईडीचे एक पथक रत्नागिरीहून कदम यांच्यासोबत मुंबईला रवाना झाले आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी शिंदे शिवसेना आणि भाजप युती सरकारने ईडीच्या कारावाईचे स्वागत केले आहे. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून विरोधकांना ईडीच्या माध्यमातून टार्गेट करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. दापोलीतील साई रिसार्ट प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. सोमय्या यांनी ईडीकडे याची तक्रार केली होती. त्यानंतर ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.