शासकीय कामात अडथळा; अभिजीत बिचुकले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

0
439

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – ‘बिग बॉस मराठी’ मुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले अभिजीत बिचुकले यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित बिचुकले साताऱ्यातील जावळी विधानसभा आणि मुंबईतील वरळी विधानसभा या दोन ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

साताऱ्यामधील शिर्के शाळेतील मतदान केंद्रावर बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असलेल्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यास (होमगार्ड) शिवीगाळ व दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप बिचुकले यांच्यावर आहे.

२१ ऑक्टोबर रोजी शिर्के शाळा मतदान केंद्रावर बिचुकले सहकुटुंब मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी होमगार्डने काठी आडवी लावल्यामुळे बिचुकलेंचा वाद झडला. याप्रकरणी संबंधित होमगार्डने सातारा शहर पोलिस ठाण्यात बिचुकलेंविरोधात तक्रार दिली होती. बुधवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत बिचुकले यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला असून होमगार्डची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.