शाळांमध्येच लसीकरण केंद्रे उभारत ‘या’ राज्यात आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाला सुरुवात

0
222

नवी दिल्ली, दि.०३ (पीसीबी) : कोरोनाने मागील महिन्यापासून देशभरात उच्छाद मांडला असून लसीकरणाचे काम जोरात सुरु आहे. नवी दिल्ली मध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात झाली असून या टप्प्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातल्या सर्वांचं लसीकरण होणार आहे. मात्र, काही राज्यांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे हे लसीकरण काही दिवस उशीरा सुरु होणार आहे. दिल्लीत आज सकाळपासून १८ ते ४५ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. साधारण ९० लाख नागरिक दिल्लीमध्ये या टप्प्यात लसीकरणासाठी पात्र असून यासाठी ७७ शाळांमध्ये प्रत्येकी ५ लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांकडून कळत आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहे.

४५ वर्षे आणि त्यावरील नागरिकांना आत्तापर्यंत दिल्लीतल्या ५००च्या आसपास लसीकरण केंद्रांमधून लस दिली जात होती. मात्र, १८ ते ४५ वयोगटातल्या सर्व नागरिकांना लसीकरणासाठी आधी नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे. दिल्लीतल्या अपोलो, फोर्टीस आणि मॅक्स या खासगी रुग्णालयांमधून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांचं लसीकरण शनिवारपासून सुरु करण्यात आलं आहे. हे लसीकरण फक्त काही मर्यादित केंद्रांवर सुरु आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं कि, दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींचे डोस मागवले असून पुढच्या तीन महिन्यात हे डोस सरकारपर्यंत पोहोचतील. पुढच्या तीन महिन्यात दिल्लीतल्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.