“तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही”

0
212

नाशिक, दि.३ (पीसीबी) : छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे. दरम्यान, सिरमचे अदर पुनावाला यांनी मोठ्या नेत्यांच्या धमक्या, दबाव येत असल्याचे म्हटले असल्याने आता सीबीआय, आयबीने धमकावणाऱ्यांना शोधावं, अशीही मागणी भुजवळ यांनी केली आहे.

छगन भुजबळांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा चिमटाही त्यांनी काढला.

समीर भुजबळ जेलमध्ये असताना चंद्रकांतदादांकडे मदत मागायला कसा जाईल? सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहीत होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे ईडी किंवा सीबीआय नाही, असं सांगतानाच अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच वडाचं तेल वांग्यावर टाकण्याचा प्रकार सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लागवला.

यावेळी त्यांनी सीरमच्या अदर पूनावालांबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. पूनावाला यांना एका मोठ्या व्यक्तीने धमक्या दिल्या. हे त्यांनी लंडनमध्ये जाऊन सांगितलं. आता सीबीआय आणि आयबीने इतर कामे करण्यापेक्षा पूनावाल यांना धमकावणाऱ्या व्यक्तीला शोधून काढलं पाहिजे, असं ते म्हणाले. पूनावालांना संरक्षण देऊन लस निर्मितीचं काम सुरू करा. पूनावाला यांना धमकी येणं चिंताजनक आहे. त्यांच्या तक्रारीची दखल कोणी घ्यायची? असा सवाल करतानाच पूनावाला यांना धमकी आल्याने त्याचा लस उत्पादनावर परिणाम होणार होईल, असंही ते म्हणाले.

अदृश्य हात नव्हे, स्पष्ट हात
यावेळी त्यांनी बंगाल निवडणुकीवरही भाष्य केलं. बंगाल निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा केवळ अदृश्य हातच नाही तर स्पष्ट हात होता, असं त्यांनी सांगितलं. पवारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मदत केली हे जगजाहीर आहे, असंही ते म्हणाले.