शहरातील ४१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

0
416

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील १८, चिंचवडमधील ११ व भोसरीतील १२ अशा एकुण ४१ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून गुरुवारी (दि. २४) बालेवाडी क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. दरम्यान, पिंपरी विधानसभेत ५१.५०, चिंचवडमध्ये ५३.३२ तर भोसरी विधानसभेत ५९.२० टक्के मतदान झाले.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे, शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार, बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे, अपक्ष अजय गायकवाड, अजय लोंढे, मुकुंदा ओव्हाळ, चंद्रकांत माने, दिपक जगताप, दिपक ताटे, नरेश लोट, बाळासाहेब ओव्हाळ, मिना यादव, युवराज दाखले, डॉ. राजेश नागोसे आणि हेमंत मोरे या १८ उमेदवार रिंगणात आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती देसले, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती, अपक्ष डॉ. मिलिंदराजे भोसले, रवींद्र पारधे, राजेंद्र काटे या ११ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे महेश लांडगे अपक्ष विलास लांडे, बहुजन समाज पार्टीचे पवार राजेंद्र आत्माराम, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख, छाया जगदाळे, हरेश डोळस, भाऊ अडागळे, मारुती पवार आणि ज्ञानेश्वर बोऱ्हाडे या १२ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.